Tag Archive | अवलिया

पु. ल – एक अवलिया


आज त्यांच्या पश्यात इतकी वर्ष होऊनही आपल लाडक व्यक्तीमत्व आपल्यातच आहे हे नेहमी वाटत. त्यांच कोणतही पुस्तक वाचायला घ्या मग ते व्यक्ती वल्ली असो किंवा जावे त्यांच्या देशा. प्रत्येक शब्द वाचताना जणू तो माणूस आपल्याशी हितगूज करत असल्याचा भास होतो. एखादयाला पुस्तक वाचण्याची गोडी नसली तरी पुलंचा कोणताही लेख ती गोडी निर्माण करण्यास नक्कीच यशस्वी होईल. त्याच कारण एकच, त्यांच्या प्रत्येक शब्दात जीवन होते.कधी शिक्षकाचे,कधी परीटाचे, कधी टागोरांचे, कधी साने गुरुजींचे, कधी कोकणातले, कधी बेळगावचे, तर कधी थेट सातासमुद्र पार वसलेल्या देशांतले. कोणत्याही जागेच किंवा कोणत्याही व्यक्तीचं त्यांनी अस काय वर्णन करून ठेवलं की ते वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या अवती भवती अशी लोक असून सुद्धा आपल्याला का नाही जमलं अस शब्दात मांडण. त्यांच्या विचारात अस काय होत की इतक सहज शब्दरुपी त्यांना साकार करता आलं. कारण त्यांच्यातलं लहान मूल आणि त्यामुळेच त्यांच्यातली  कुतुहूलता हे दोन्ही आयुष्यभर शाबूत होते. जे आपल्याला कधीच जमलं नाही.
व्यक्ती आणि वल्ली मधला प्रत्येक माणूस हा तुमच्या आमच्यासारखाच पण प्रत्येकातली खासियत ही त्यांनीच जाणली आणि आपल्या मिश्कील शैलीत ती अजूनच खुलवली. त्यांचे बहुतेक लेख हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले अनुभवच म्हणता येतील. उदारणार्थ परदेशवारीचा पहिला योग म्हणा, किंवा पहिल्यांदा पंचतारांकित रेस्तौरां मध्ये जाण्याचा योग असो त्यातली फजिती, गम्मत ही फक्त पुलंनाच कळली आणि आपल्या विचारांनी ती अलंकृत ही केली. अशा माणसाला अवलियाच म्हणायला हव. साध्या पोस्ट ऑफिस बद्दल त्यांनी जे वर्णन केल आहे त्यातला खडानखडा खर आहे. प्रत्येकाला पोस्टात गेल्यावर हे असं जाणवल नसेल तरच नवल पण शब्दांची किमया त्या जादूगारालाच जमली. पाळीव प्राणी ह्या त्यांच्या लेखातलं श्वानांच आणि त्यांच्या मालकांच इतक गम्मतशीर वर्णन उभ्या आयुष्यात कुणाला जमेल? असा मी असा मी मधल्या महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय गृहस्थाचे आयुष्य अगदी समर्पकपणे शब्दबद्ध केले.

त्यांच्या कोणत्याही लेखाचे शीर्षक वाचले की जाणवेल की ह्यावर कोणी एका पानापेक्षा लिहूच शकत नाही. पण आपल्या लाडक्या पुलंना ते शक्य होते. कल्पना आणि सत्य ह्यात त्यांनी कधी गल्लत होऊ दिली नाही. सत्याला आपल्या अद्बभूत कल्पनेची सुंदर झालर जोडून एकाहून एक सरस कलाकृत्या वाचकांना बहाल केल्या.

आज ही हा कोट्याधीश अवलिया स्वर्गलोकात असा मी असा मी म्हणत साक्षात इंद्रदेवाची खिल्ली उडवत असेल कोण जाणे. आणि इंद्रदेव ही त्यांचा हा तीन पैशांचा तमाशा पाहण्यात रमून गेले असतील. ही गोळाबेरीज त्या भाग्यवानालाच जमली

deshpande

PL deshpande

Pics courtesy : http://cooldeepak.blogspot.in/